Local Train Service : लवकरच ठराविक वेळेत मुंबई लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू होणार ?
मुंबई; पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासून शासनाने सर्वच वाहतूक सेवा बंद केल्या होत्या. तसेच मुंबईतील लोकल ट्रेन (Local Train Service ) सुद्धा तेव्हापासून बंदच आहे. आता राज्यात अनलॉक असल्याने लवकरच मुंबई लोकल ठराविक वेळेत सर्वांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. ही मुंबईतील नागरिकांसाठी उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या (Local Train Service ) संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सध्या अनेक वाहने सेवा सुरु झाले असून, मुंबईतील लोकल ट्रेन सुरु व्हावी ही मुंबईकरांची मागणी आता पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत असली तरी पूर्ण वेळ मुंबई लोकल ट्रेन सेवेसाठी मुंबईकरांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, चाकरमान्यांची प्रवासाची अडचण लक्षात घेऊन काही प्रमाणात दिलासा देण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्यानुसार, कमी गर्दीच्या वेळेस म्हणजे, सकाळी ७ च्या आधी आणि रात्री १० नंतर लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची मागणी सातत्यानं होत आहे. परंतु राज्य सरकार अत्यंत सावधपणे पावले टाकत असल्यानं अद्याप पूर्ण क्षमतेनं सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. या संदर्भात सतत नवनव्या तारखा दिल्या जात आहेत. सुरुवातीला डिसेंबरच्या महिन्यात लोकल सुरू करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, तो मुहूर्तकाही लागला नाही. त्यानंतर नव्या वर्षात करोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेतला जाईल, असे शासनाकडून सांगण्यात आले होते. आता वेगळीच माहिती समोर येत आहे. की, मुबईतील लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा विचार सुरूआहे. मात्र लोकल सेवा पूर्ण वेळ नसेल, त्याऐवजी कमीत कमी गर्दी असलेल्या वेळेत ट्रेन सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार होत आहे.
सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारनं वेळोवेळी परवानगी दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. महिलांनाही प्रवासाची मुभा असली तरी त्यासाठी ठराविक वेळा देण्यात आल्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर १३६७ तर, मध्य रेल्वे मार्गावर १७७४ फेऱ्या चालवल्या जात आहेत. ‘लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीनं या आठवड्यात आढावा घेण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाला काही वेळ लागेल. स्थानकावरील गर्दीच्या व्यवस्थापनाची व्यवस्था आपल्याकडं नसणं ही ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्याच्या दृष्टीनं मोठी अडचण आहे, असे या संदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.