धक्कादायक ! टॉयलेटमध्ये मोबाइल लपवून व्हिडीओ बनवत होता ‘तो’, महिलेमुळं अटकेत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – रहिवाशी चाळीतील सार्वजनिक शौचालयात मोबाइल लपवून महिलेचा व्हिडीओ रेकॉर्ड करणार्‍या तरुणाला मुंबई पोलिसांनी आग्रीपाडा परिसरातून अटक केली आहे. प्रशांत सिंह असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक महिला रहिवाशी चाळीतील सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्याआधी प्रशांतने मोबाईल फोन शौचालयाच्या खिडकीजवळ ठेवला होता. महिलेचे लक्ष मोबाइलकडे गेल्यामुळे तिने मोबाइल घेतला आणि शौचालयाच्या बाहेर आली. महिला बाहेर येताच मोबाइल लपवणारा प्रशांतहीसमोर आला.

त्याने महिलेकडे मोबाइल परत मागितला. महिलेने तोपर्यंत भावाला आणि चाळीतील इतर रहिवाशांना बोलावून घडलेली घटना सांगितली. त्यानंतर रहिवाशांनी प्रशांतला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ गॅलरीत महिलेचा शौचालयाचा व्हिडिओ होता. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केली असून त्याचा मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.