Lockdown काळात केलेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू, 4 पोलिस तडकाफडकी निलंबीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत 29 मार्च रोजी बेदम मारहाण करुन तरुणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली चार पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेले चौघेही जुहू पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या पोलिसावर आरोप झाल्यानंतर त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात आली होती.

संतोष देसाई, आनंद गायकवाड, दिगंबर चव्हाण आणि अंकुश पालवे असे निलंबित करण्यात आलेल्या जूहू पोलीस ठाणातील पोलीस कॉन्स्टेबलची नावे आहेत. त्यांच्यावर एका व्यक्तीला मारहाण करण्याचा आरोप आहे. त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर या चौघांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. हायकोर्टात याप्रकरणी याचिका दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अधिक माहिती अशी की, 29 मार्च रोजी देवेंद्र (वय-22) याच्यावर जमावाने हल्ला केला होता. त्याच्यावर लूटमार केल्याचा संशय होता, अशी माहिती पोलिसांनी दिला होती. दुसरीकडे देवेंद्रच्या कुटुंबियांनी पोलिसांवर आरोप केला. देवेंद्रला पोलीस ठाण्यात घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांनी आम्हाला दिली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी देवेंद्र जवळच्या चौकात सापडला. त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नंतर सांगितल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

सरकारी वकील पुर्णिमा कँथारिया यांनी हायकोर्टात सांगितले, की चार पोलीस कर्मचाऱ्यांनी देवेंद्र याला बेदम मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर पोलीस विभागाने आरोपी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. पोलीस विभागाने आरोपी असलेल्या चार पोलीस कॉन्स्टेबल्सना निलंबित करून त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरु केली आहे.