राज्य सरकारचा मोठा निर्णय ! मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दिली ‘ही’ नवी ‘जबाबदारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. राज्यातील पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून या परिस्थितीत कर्तव्य पार पाडत आहे. पोलिसांवर पडत असलेला अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात ड्युटी लागणार आहे.

लॉकडाऊनच्या बंदोबस्तात पोलीस कर्मचारी कमी पडू नयेत यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील कर्मचारी हे महाराष्ट्रातून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनेचे काम करणार आहेत. राज्य सरकारच्या वतीने यासंदर्भात शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या आदेशामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यातील पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. राज्यातील तब्बल बाराशे पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत परप्रांतीय कामगारांना परत त्यांच्या मुळगावी पाठवण्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत करावी लागणार आहे. त्यासाठी मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती पोलीस ठाण्यात काम करण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने राज्यात जवळपास दीड हजार कर्मचारी वर्ग पोलिसांच्या मदतीला येतील असा अंदाज आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात पुढील कामासाठी हजर व्हावे असे आदेश दिले आहेत. जे कर्मचारी या संदर्भात हजर होणार नाहीत त्यांच्यावर आपत्कालीन परिस्थितीच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

परंतु शासनाच्या या नियमाच्या विरोधात मंत्रालय कर्मचारी यांच्यामध्ये नाराजीचा सूर निघत आहे. परप्रांतीय कामगारांच्या परतीसाठी हे कर्मचारी काम करणार आहेत. परप्रांतियांना परत पाठवण्यासाठी प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून गुप्ता यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे