ठाकरे सरकार पुन्हा Lockdown च्या विचारात ? मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले महत्त्वाचे संकेत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईची लाईफ लाईन म्हटली जाणारी लोकल सेवा सुरू होऊन 2 आठवडे पूर्ण झाले आहेत. या दरम्यान शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्याच्या अनेक भागातही कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील असंही त्या म्हणाल्या आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. त्यामुळं पुन्हा लॉकडाऊन होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर पेडणेकर यांनी सूचक विधान केलं आहे. त्या म्हणाल्या, गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जर हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर महापालिकेला कठोर निर्णय घ्यावे लागतील. रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ होत असून मृत्यूचं प्रमाणंही दिसत आहे असंही त्यांनी सांगितलं.

पुढं बोलताना त्या म्हणाल्या, मुंबईतील लोकल सामान्यांसाठी सुरू करण्यात आली, तेव्हापासून कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. लोक स्वत:ची काळजी घेत नसतील तर लॉकडाऊन करण्याची वेळ येईल. तशी चिंता राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. प्रत्येकांना कुटुंबातील सदस्याला जपलं पाहिजे आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. तरच आपण कोरोनाची दुसरी लाट थोपवू शकतो. रुग्णांची संख्या वाढत राहिली तर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागेल असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री थोड्याच वेळात घेणार राज्यातील स्थितीचा आढावा

कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. दुपारी 4 वाजता व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे मुख्यमंत्री सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ तसंच महापालिका आयुक्त यांच्याकडून जिल्ह्यांमधील परिस्थिती जाणून घेणार आहे. दुपारी 4 वाजता ही बैठकही होणार असल्याचं सांगितलं गेलं होतं.