मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र शनिवारी (दि.1 ऑगस्ट) त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाईन झाल्या होत्या. बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. महापौर किशोरी पेडणेकर 14 दिवस घरीच होत्या. तसेच त्या काही पत्रकारांच्या संपर्कात देखील आल्या होत्या.

संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. अशातच लॉकडाऊन हळहळू शिथिल करण्यात येत आहे. परिणामी राज्यातील कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 जुलै रोजी 10320 नवे रुग्ण आढळून आले होत तर 265 जणांचा मृत्यू झाला.