‘आरे’ ची जमीन जंगल घोषीत करणार : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतल्या आरे मधील मेट्रो कार शेडचा निर्णय आता बारगळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. आरे मधील 600 एकर जमीन ही जंगल म्हणून घोषीत करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिष्ठेचा केलेला मेट्रो कार शडची जागा आता बदलण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. एखाद्या महानगरच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आज एक बैठक घेतली या बैठकीला आरे, वन आणि पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय वन कायद्याच्या कलम 4 नुसार राज्य सरकार आरेमधील 600 एकर जागा जंगल म्हणून घोषीत करणार आहे. त्यामुळे इथल्या आदिवासींचे हक्क कायम राखले जातील असेही त्यांनी सांगितले. तसेच राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व प्रकारची बांधकामे, झोपड्या, रस्ते आणि आदिवासी पाडे तसेच इतर शासकीय सुविधा पहिल्या टप्प्यातून वगळ्यात येणार आहेत. तसेच येथील झोपड्यांचे पुनर्वसनही तातडीने सुरु करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हा वन विभागाकडून लवकरच सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार आहे.