‘उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही; फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा’; चंद्रकांत पाटलांनी दिला सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयानं कांजूरमार्ग येथील कामाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपचा खेळ सुरु झाला आहे. मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण आता चांगलाच तापलं आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मेट्रो कारशेडबद्दल भाष्य केलं होतं. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.

… ते जनतेला भ्रमात पाडणारे आहे – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
टीम इंडिया असं समजून काम करा उद्धवजी… आताही वेळ आहे. आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करेत. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे ८० टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. तुम्ही सुरूवातीपासूनच याला इगोचा विषय बनविला, जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते. तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता. पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे. ते जनतेला भ्रमात पाडणारे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे.

… तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ ८०%पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार! मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे!