Coronavirus Lockdown : मुंबईच्या बांद्रा स्टेशनवर मजुरांची रस्त्यावर ‘तोबा’ गर्दी, पोलिसांकडून ‘लाठीचार्ज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम असल्याचं घोषित केलं. त्यानंतर वेगवेगळया ठिकाणावरून प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे. काही वेळापुर्वी ठाण्यामध्ये अनेक मजुर रस्त्यावर आल्याची बातमी समोर आली होती. आता मुंबईतील बांद्रा स्टेशनवरील रस्त्यावर एकत्र आल्याचं समोर आलं आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मजुरांना तात्काळ रस्ता खाली करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, एका राष्ट्रीय चॅनलनं मजुरांवर पोलिसांनी बळाचा वापर केला असल्याचं वृत्त दिलं आहे.

रस्त्यावर एकत्र आलेले मजुर हे प्रवासी असून इतर ठिकाणचे असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना व्हायरसनं मुंबईत थैमान घातलं आहे. एकटया मुंबईत 100 हून अधिक बळी गेले आहेत तर कोरोनाबाधितांची संख्या 1000 हून अधिक आहे. अशा परिस्थितीत प्रवासी मजुर रस्त्यावर आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस त्यांना तात्काळ रस्ता खाली करण्यासाठी विनवणी करीत आहेत. दरम्यान, एका राष्ट्रीय चॅनलने मजुरांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार केल्याचं वृत्त दिलं आहे. दरम्यान, पोलिस दलातील बडे अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत.

दरम्यान, मजुरांनी एवढ्या मोठया प्रमाणावर गर्दी केली होती की पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज करणं भाग पडलं. पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीचार्जचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री आज रात्री 8 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.