Coronavirus : मुंबईत 10 हजारांपेक्षा अधिक रूग्ण घरी राहूनच देतायेत ‘कोरोना’ विरूध्द लढा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशामध्ये महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तर महाराष्ट्रात राजधानी मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयांवर येणारा ताण त्या तुलनेत वाढत नसल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. याचे कारण म्हणजे मुंबईतील एकूण बाधित रुग्णांपैकी तब्बल 45 टक्के म्हणजेच 10 हजारापेक्षा अधिक रुग्ण रुग्णालयातच गेले नाहीत. हे रुग्ण घरी राहूनच कोरोना विरुद्ध लढा देत आहेत.

गुरुवार (दि. 16) दुपारपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत 22 हजार 828 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील 10 हजार 366 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. घरी राहूनच ते डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. याउलट रुग्णालयामध्ये 9771 रुग्ण आहेत. तर नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये केवळ 2691 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मोठ्या संख्येने रुग्णांनी घरी राहून उपचार करण्यास पसंती देणं हे कोरोनाची साथ ओसरत असल्याचे निदर्शक आहे, असे डॉक्टरांना वाटते. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी होण्यामागे वेगवेगळी कारणं असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. पॉझिटिव्ह रुग्णांनी होम क्वारंटाइन होण्याचं प्रमाण मागील आठवड्यात अधिक वाढले. कोरोनाच्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या काळात रुग्ण चाळी आणि झोपडपट्टीतील होते. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी संसर्ग होण्याचे प्रमाण घटले आहे.सध्या कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण उच्च मध्यमवर्गीय वस्त्या व टॉवरमधील रहिवाशांमध्ये अधिक दिसून येत आहे. या लोकांना स्वत:ला विलग करण्यासाठी पुरेशी जागा आणि सोय असल्याने ते रुग्णालयात दाखल होत नाहीत, असे महापालिकेच्या विशेष प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

होम क्वारंटाईन रुग्णांवर उपचार करणारे ग्राण्ट मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. हेमंत गुप्ता यांनी या संदर्भातील आपला अनुभव सांगितला, ते म्हणाले, सुरुवातीचे काही दिवस कठीण असतात. अनेकांना ताप, खोखला, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटते. ते सातत्याने फोन करतात. त्यांच्या आजारावर औषध सुचवण्यासोबतच त्यांचे समुपदेशनही करावे लागते काही रुग्ण दिवसातून किमान 50 वेळा त्यांची ऑक्सिजन लेव्हल चेक करतात. एखाद्या रुग्णाचा खोकला आणि ताप कमी होत नसेल तर मी त्यांना एक्स रे काढण्याचा सल्ला देतो. आतापर्यंत मी अशा 50 रुग्णांवर उपचार केले असल्याचे त्यांनी सांगितले.