काय सांगता ! होय, मुंबईत तब्बल 75 हजार लोकांना संस्थात्मक ‘क्वारंटाईन’ करण्याची तयारी ?

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विविध भागात कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. विेशेषतः मुंबईत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आठवड्यात ही संख्या तीस हजारापुढे जाईल असा अंदाज महापालिका अधिकार्‍यांचा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आता 75 हजार लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्याच्या दृष्टीने योजना आखण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील कोरोनाची लागण होत असल्याची संख्या वाढत असून पालिकेने रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. तर दुसरीकडे संस्थात्मक क्वारंटाइनची संख्या वाढविण्यासाठी विभागवार शाळा, मंगल कार्यालयं, विविध संस्थांचे हॉल आदी ताब्यात घेण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रामुख्याने धारावी सारख्या ठिकाणी एकेका घरात 10 ते 15 लोक राहतात अशा ठिकाणी घरात क्वारंटाइन करणे ही आपलीच फसवणूक असल्याचा मुद्दा पुढे आला.

सार्वजनिक शौचालये तसेच झोपडपट्टीतील लोकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून किमान 75 हजार लोकांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था केली पाहिजे अशी आग्रही भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली आहे. आपण अशी व्यवस्था तातडीने उभी करण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना सांगितल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. अंधेरीपर्यंत संस्थात्मक क्वारंटाइनची व्यवस्था होणे गरजेचे आहे. धारावीसह अनक दाटीवाटीच्या विभागात तसेच झोपडपट्टीत आतपर्यंत घरोघरी जाऊन कोरोनाची माहिती घेण्याबाबत पालिकेचे कर्मचारीही घाबरत आहेत.