‘कोरोना’च्या नव्या आव्हानास मुंबई पालिका सज्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोना संसर्गाची परिस्तिथी आटोक्यात आली आहे. मात्र परदेशात ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी  लाट आल्याचे बोलले जात आहे. यावेळी कोरोनाचे संक्रमण जलदगतीने होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने ब्रिटनची हवाई सेवा बंद केली आहे. दरम्यान, मुंबई पालिका प्रशासन सतर्क असून काेराेनाच्या सुरुवातीच्या काळात केलेल्या चुका टाळण्यासाठी कठाेर पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार ‘नव्या कोविड’शी लढण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

सुरुवातीच्या काळात म्हणजे १ फेब्रुवारी ते २२ मार्च या दरम्यान परदेशातून आलेल्या प्रवाशांवर कोणतीही बंधने नसल्याने मुंबई, महाराष्ट्रासह भारतात कोविड वाढला. त्या काळात परदेशातून दोन लाख प्रवासी मुंबईत आले. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात कोविड पसरला. ही चूक पुन्हा होऊ नये,  यासाठी आता खबरदारी घेण्यात येत असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

९ मार्च रोजी राज्यात पहिला कोविड रुग्ण आढळला. हे कुटुंब आखाती देशातून आले हाेते. तर, मुंबईत आढळलेला पहिला रुग्णही याच प्रवाशांबराेबर आला होता. त्यानंतर राज्य सरकारने आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करण्याचीही परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. तर परदेशातून आलेले काही प्रवासी इतर विमानतळांवर उतरून मुंबईतील आंतरदेशी विमानतळावर येत होते. सुरुवातीला आंतरदेशी विमानतळावरही प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात नव्हते, असे पालिका आयुक्तांनी निदर्शनास आणले.

इंग्लंडमधून  एक हजार प्रवासी येणार
इंग्लंडमधील कोरोनाची स्थिती पाहता राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून १५ दिवसांची रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. तर आज रात्री  मुंबईत इंग्लंडमधून पाच विमानांतून १००० प्रवासी दाखल होणार आहेत.  मुंबई पालिकेने प्रवाशांना  क्वारंटाइन करण्यासाठी पंचतारांकित व फोर स्टार हाॅटेलमध्ये  एक हजार खोल्या तर बजेट हाॅटेलमध्ये एक हजार खोल्या ठेवल्या आहेत. ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळतील त्यांना थेट मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात पाठविण्यात येईल, अशी माहिती मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी दिली. परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला मुंबईतच क्वारंटाइन व्हावे लागेल. मुंबईबाहेर राहणाऱ्या प्रवाशांना सात दिवस घरी जाण्याची परवानगी मिळणार नाही.