मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोडकीस आलेल्या घराच्या वाढीव दुरुस्तीचे काम बंद करुन कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला सापळा रचून पकडले.

गणेश रमेश बडगे (वय २७, कनिष्ठ अभियंता, इमारती व कारखाने विभाग, जी नॉर्थ मुंबई महापालिका दादर पश्चिम) असे त्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार हे त्यांच्या मोडकळीस आलेल्या राहते घराच्या वाढीव दुरुस्तीचे काम करीत होते. यावेळी कनिष्ठ अभियंता याने १८ डिसेंबर रोजी बांधकाम बंद करण्यास सांगून त्यांना कार्यालयात भेटण्यास बोलविले. तक्रारदार २३ डिसेंबर रोजी त्यांना कार्यालयात जाऊन भेटले. त्यावेळी बडगे याने त्यांच्याकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार घरमालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ डिसेंबर रोजी केली.

या तक्रारीवरुन २८ डिसेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यात बडगे याने कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २९ डिसेंबर रोजी सापळा रचला. तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेताना गणेश बडगे याला रंगेहाथ पकडले.