मुंबईच्या ‘नाईट लाईफ’वर आली बंधने; पबमधील विनामास्क 600 जणांवर कारवाई करुन दंड वसुल

मुंबई : राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे आता मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. शनिवारी रात्री महापालिका व पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी करुन तसेच हॉटेल, परमिटरुम, पबमध्ये तपासणी करुन मास्क, सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्‍या ६०० जणांवर कारवाई केली आहे.

मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी करुन तपासणी केली. त्यात विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी बांद्रा परिसरातील ५ पबची तपासणी केली. तेथील मास्क न लावलेल्या ६०० जणांकडून १ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल पब मालकांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही अशीच सुरु राहणार असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले़.