धक्कादायक : समलिंगी संबंधांतून BMC कर्मचाऱ्याचा खून, भिवंडीत पुरला मृतदेह

पोलिसनामा ऑनलाइन – एकाची हत्या करून त्याचा मृतदेह भिवंडी येथील जंगलात पुरल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. समलैंगिक संबंधातून हा खून झाल्याचं बोललं जात आहे. ज्यांना अटक झाली आहे ते आरोपी रेल्वे आणि प्राप्तीकर खात्यात नोकरीला आहेत. सदर दोन्ही आरोपींना न्यायालयानं 19 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

28 ऑगस्ट रोजी नागपाडा पोलीस ठाण्यात मुंबई महापालिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेला 45 वर्षीय व्यक्ती हरवला असल्याची तक्रार कुटुंबियांकडून करण्यात आली होती. याची तातडीनं दखल घेत नागपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम, दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश मांजरेकर, उपनिरीक्षक एकनाथ देसाई, बीडी जाधव, अनिल शिंदेयांच्या पथकानं या प्रकरणाचा शोध सुरू केला.

तपास करत असताना सुरुवातीला त्या बेपत्ता व्यक्तीचा मोबाईल बंद येत होता. बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवलं असता त्यातूनही काही व्यवहार होत नसल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. घरात पत्नीसोबत उडणाऱ्या खटक्यांमुळं ही व्यक्ती घराबाहेर पडल्याचा अंदाज बांधला जात होता. परंतु मोबाईल आणि इतरही व्यवहार बंद असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी आणखी खोलात जाऊन तपास सुरू केला. त्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता तो हरवण्यापूर्वी संपर्कात असलेल्या व्यक्तींचे नंबर पोलिसांना मिळाले. या नंबरवरून एलफिन्स्टन परिसरात राहणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पोलीस चौकशी करत असताना आधी तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. नंतर मात्र दोघांनी खुनाची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या एका तरुणाचे मृत व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध होते.

मित्राच्या मदतीनं काढला काटा

या दोघांची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती. परंतु घरातील लोक लग्न जमवण्याचा विचार करत असल्यानं हे संबंध सुरू ठेवण्यास आरोपी तरुणानं नकार दिला. परंतु तरीही ज्याचा खून झाला ती व्यक्ती तरुणाचा पिच्छा सोडत नव्हती. अखेर या तरुणानं आपल्या मित्राच्या मदतीनं त्या व्यक्तीचा काटा काढला.

नशेतच चाकूनं केला खून

दारूची पार्टी असल्याचं सांगत दोघेजणं त्याला भिवंडीला घेऊन गेले. या ठिकाणी त्याला दारू पाजली. नशेतच चाकूनं त्याचा खून केला. तिथंच जवळ असलेल्या जंगलात दोन दिवस आधीच खणून ठेवलेल्या खड्ड्यात त्यांनी हा मृतदेह पुरून टाकला. सदर दोन्ही आरोपींना न्यायालयानं 19 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.