आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला भीषण अपघात ; ४ ठार, ३ गंभीर

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन – इंदौरमधील सिंगरोल पोलीस स्टेशन हद्दीतील बोरगाव मंजू येथील आरोपीने अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून फूस लावून पळवून आणले होते. पोलिसांनी या आरोपीसह त्यांच्या ४ नातेवाईकांना अटक करून इंदोरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनकडे घेऊन निघाले होते. याच दरम्यान मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा जवळील धानोरा (विटाळी) येथे आज (सोमवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चित्रपटातील सीन प्रमाणे भीषण अपघात

आज (सोमवार) 14 जानेवारीच्या पहाटे ५ च्या सुमारास नांदुरा जवळील धानोरा (विटाळी) जवळ ओवरटेक करताना पोलीस व आरोपी असलेली झायलो गाडी समोरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली हा अपघात  एवढा जबरदस्त होता की झायलो गाडी हवेत  उडाली व मागून येणाऱ्या फोर्ड फिगो कारवर आदळली. फोर्ड फिगो कारमधील इंदौर येथील राहिवाशी शैलेष व त्यांचे २ मित्र नांदेड गुरुद्वारा येथून दर्शन घेऊन इंदौर आपल्या घराकडे निघाले होते. त्यांच्या कारचे नुकसान झाले  परंतु सुदैवाने  तिघेही सुखरूप बचवाले.

अपघातात पोलिसांच्या कारमधील ४ जण ठार झाले, तर 3 जखमी झाले आहेत. तर सिमरोल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिपक मंडलोई, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश कंनोजसह आरोपी रोहीत अविनाश रायबोले हे तिघे गंभीर जखमी झाले.  यातील ४ पैकी दोघांची ओळख पटली आहे. सुनील गौरीशंकर परदेशी, मनोज रामेश्वर खरेबीन दोघे (रा.बोरगांव मंजु जि. अकोला) तर दोघांची अद्याप ओळख पटली नाही. अपघातातील जखमींना प्रथम वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर मलकापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.