सत्तेची कोंडी फुटणार ! अशा प्रकारे होणार मंत्रिपदाची वाटणी, ‘हा’ आहे फॉर्म्युला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी सध्या दिल्लीतून सूत्र हालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक सध्या दिल्लीला पार पडणार आहे. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा केली जाऊ शकते. सत्तेची कोंडी फोडण्याबाबतचा एक नवा फॉर्म्युला सध्या समोर आलेला आहे. अनेक दिवसांपासून होत असलेल्या बैठकांवरून एका फॉर्म्युल्यावर एक मत होण्याची शक्यता असल्याचे समजते.

मंत्रिपदाच्या वाटणीबाबत 16-15-12 या फॉर्म्युल्यावर तीनही पक्षांच्या वतीने चर्चा करून निश्चिती करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. शिवसेनेला 16 राष्ट्रवादीला 15 तर काँग्रेसला 12 मंत्रिपद दिली जाऊ शकतात. मुख्यमंत्री पदाबाबत अडीच वर्षे शिवसेना आणि अडीच वर्ष राष्ट्रवादी असे विभाजन केले जाणार आहे तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने याला आक्षेप देखील दर्शवलेला नाही.

विधानसभा अध्यक्ष पद महत्वाचे आहे त्यामुळे राष्ट्रवादीने या पदावर दावा केला आहे मात्र याबाबत एकमत होऊ शकलेले नाही. काँग्रेस देखील या पदाबाबत आग्रही आहे. तसेच मित्र पक्षांबाबत देखील आजच्या बैठकीत निर्णय करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत देखील आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

लवकरच होणार शपथविधी
आगामी चार पाच दिवसात राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच सर्व आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावले असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. तसेच यावेळी सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे हेच पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केल्याचेही सत्तार यांनी सांगितले. तसेच सत्ता स्थापनेचं चित्र शुक्रवारी होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल असंही ते म्हणाले.

Visit :  Policenama.com