अतुल भातखळकर यांची जयंत पाटलांवर टीका, म्हणाले – ‘हे विधान करून तुम्ही बुरसटलेली पुरुषी वर्चस्ववादी वृत्ती दाखवली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य़क्ष जयंत पाटील यांनी एक विधान केले होते. महिलेच्या मतदारसंघात जाऊन निवडणुक लढवणे हा काय पुरुषार्थ आहे का, असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. दरम्यान जयंत पाटलांच्या या विधानावर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी घणाघाती टीका केली आहे. जयंत पाटीलांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या मनातील बुरसटलेली पुरुषी वर्चस्ववादी, सुलतानशाही वृत्ती दाखवून दिल्याची जळजळीत टीका भातखळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा मनोवृत्तीच्या पाटील यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील भातखळकर यांनी केली आहे.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, स्त्री पुरुष समानतेच्या एकविसाव्या शतकातही जयंत पाटील यांनी आपली बुरसटलेली पुरुषी वर्चस्ववादी प्रवृत्ती दाखवून दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले व सावत्रीबाई फुले यांनी दिलेली समतेची शिकवण जयंत पाटील यांना पक्षाकडून देण्याची खरी गरज आहे. सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामतीतून उद्या पार्थ पवार किंवा रोहित पवार निवडणुक लढली तरीही जयंत पाटील हेच विधान करणार आहेत का ? राज्यात महिला धोरण आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हे विधान मान्य आहे का ? केवळ डोक्यावरील पगड्यांची अदलाबदल करून स्त्री पुरुष समानतेचे विचार डोक्यात शिरत नाहीत हे ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ध्यानात ठेवावे अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.