Coronavirus : महाराष्ट्र अद्याप ‘कोरोना’च्या तिसऱ्या ‘टप्प्यात’ नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून राज्यात करोनाबाधितांचा आकडा 1135 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 117 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. महाराष्ट्रात अजून कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही. त्यामुळे येत्या काळात आपण अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे, असे टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे पुढे म्हणाले, कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक तालुक्यात रक्षक हॉस्पीटल सुरु करण्यात येत असून मोठ्या शहरांमध्य मोबाइल क्लिनिक उपलब्ध केले जाणार आहे. कोरोनाबाधीत रुग्णांवरील उपचारांत सुसूत्रता यावी यासाठी त्यांच्यातील लक्षणानुसार विभागणी करण्यात येत आहे. कोरोनाची तीव्र लक्षणे असणारे रुग्ण तसेच सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णावर मुंबई इस्पितळ, लीलावती, पोद्दार, धारावी येथील साई हॉस्पिटल आणि सुश्रुता रुग्णालयात उपचार होणार आहेत. तर तीव्र लक्षण असणाऱ्या रुग्णांवर सेव्हन हिल्स, नानावटी, कस्तुरबा आणि सैफी या रुग्णालयात उपचार होतील असे टोपे यांनी सांगिते. देशाच्या तुलनेत राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आधीच विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीस कोरोना झाल्यास अशा रुग्णाची प्रकृती वेगाने ढासळते. राज्यात अशाच रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे टोपे यांनी सांगितले.