‘मंजिल मिली उनको जो दौड मे शामील न थे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभर आंदोलन केले आहे. भाजपने मुंबईतील आझाद मैदानात सभा घेतली. यामध्ये भाजपने उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर हल्लाबोल केला. आझाद मैदानावर झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेरोशायरीतून काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेसवर टीका केली. ‘आज जो हुए मशहुर, जो कभी काबिल न थे… और मंजिल मिली उनको, जो दौड में शामिल न थे’ असा शेर म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील आत्याचाराच्या मुद्यावरून भाजपने राज्यभर आंदोलनं केली. मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनामध्ये भाजपचे सर्व नेते सहभागी झाले होते. त्यांनी या ठिकाणी ठिय्या दिला. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारला जागं करण्यासाठी भाजपने हे आंदोलन केले आहे. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे सरकार म्हणजे वचनभंगाची सुरुवात आहे. 25 हजार रुपये हेक्टरी देण्याचं वचन दिलं गेलं होतं. त्याच काय झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आत्ताच्या सरकारच्या धर्तीवर कर्जमाफी करायची झाली तर पूर्ण कर्जमाफीसाठी 407 दिवस लागतील. एवढे दिवस हे सरकार राहणार आहे का, अशी विचारणा फडणवीस यांनी यावेळी केली.

17 बहाणे सांगता येतात
मागच्या सरकारनं केलेली काम रद्द करण्याचं काम हे सरकार करत आहे. जलयुक्त शिवार योजनेबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्रुटी असल्याचं सांगितलं जातंय. त्रुटी असतील तर सुधारा ना, असं सांगत काम करायचं नसलं की 17 बहाणे सांगता येतात असा चिमटा त्यांनी ठाकरे सरकारला काढला आहे.