उद्धव ठाकरे सरकारचा कारभार ‘अतिरिक्त’वर !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कारभार सध्या ‘अतिरिक्त’वरच चालला आहे. सनदी तसेच गृह विभागांमध्ये अनेक अधिकार्‍यांकडे एकापेक्षा जास्त पदभार असताना, वरिष्ठ आणि अनुभवी सदानंद दाते यांच्यासह काही सनदी व पोलीस अधिकारी गेली पाच-सहा महिने नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात सत्ताबदल होताच फडणवीस सरकारच्या काळातील जवळच्या काही अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. संजय कुमार यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रशासनातील विस्कटलेली घडी नीट बसेल अशी अपेक्षा केली जाते. मात्र आजही मुख्य सचिवनंतर महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या गृह विभागाचा कारभार अतिरिक्त कार्यभारावरच सुरू आहे. संजय कुमार यांच्याकडे सुमारे दीड वर्षे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. आता तो सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे देण्यात आला आहे.

इक्बालसिंग चहल यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी बदली झाल्यापासून जलसंपदा विभागाचा अतिरिक्त कार्यभार नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्याकडे आहे. वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कारभार आहे. गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. श्रीनिवास यांच्याकडे आहे.

मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशीष कुमार सिंह यांच्याकडे परिवहन, तर त्यांच्या पत्नी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्याकडे पर्यटन विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदी मनीषा पाटणकर- म्हैसकर यांची बदली झाली असली तरी यांच्याकडे मुख्य राजशिष्टाचार अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.