Mumbai News : तुमचा नगरसेवक करतो काय ? नागरीकायन संस्थेकडून प्रगतीपुस्तकांचे App

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   ‘माझा प्रभाग माझा नगरसेवक’ (माहितीचा अधिकार वापरून नगरसेवकांच्या कार्याचे मूल्यमापन) या प्रकल्पांतर्गत लोकसहभागातून लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या ‘नागरिकायन’ या संशोधन केंद्राच्यावतीने माझा नगरसेवक My Corporator हे ॲप बनविण्यात आले आहे. या ॲपचे ऑनलाइन लॉन्चिंग नुकतेच करण्यात आले. पीसीजीटीचे संस्थापक विश्वस्त ज्युलियो रिबेरो, माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी, मनीलाइफ फाऊंडेशनच्या सुचेता दलाल, माहिती अधिकार मंचाचे भास्कर प्रभू, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सहयोगी प्राध्यापक संजीव चांदोरकर आणि परिवर्तन भारतचे तन्मय कानिटकर या मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत ॲपचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास पीसीजीटीच्या आणखी एक विश्वस्त ॲना सलढाणा आणि तेथील माहिती अधिकार विभागाचे सल्लागार रंगा राव हेही उपस्थित होते. त्याचप्रमाणे ‘माझा प्रभाग माझा नगरसेवक’ या प्रकल्पात सहभागी झालेले मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि मुंबईतील वेगवेगळ्या प्रभागांमधील कार्यक्रर्तेही उपस्थित होते.

या ॲपमध्ये काय आहे.

१. सन २०१२ ते २०१६ या कालावधीतील १६ नगरसेवकांचे अहवाल तर २०१७-१८ या कालावधीतील १८ नगरसेवकांचे अहवाल असे एकूण ३४ अहवाल असून हे सर्व अहवाल नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

२. मुंबई आणि मुंबईबाहेरील कोणत्याही नागरिकास आपल्या नगरसेवकाचे प्रगतिपुस्तक बनवायचे असल्यास या ॲपवरील माझा प्रभाग माझा नगरसेवक या पानावरील प्राथमिक माहिती भरून या उपक्रमात सहभागी होता येईल.

३. या ॲपच्या माध्यमातून कोरोना काळातील तुमच्या नगरसेवकाचे वर्तन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी या ॲपवरील ‘तुमचा नगरसेवक करतो काय’ या पानावरील माहिती भरल्यानंतर मराठी आणि इंग्रजी भाषेतील सर्वेक्षणाचा अर्ज संबंधितांना ईमेलद्वारे पाठविण्यात येईल.

४. नगरसेवकांची कामे काय असतात इथपासून नगरसेवक पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरताना काय काळजी घ्यावी, याविषयीची सर्व माहिती देणारी ‘नगरसेवक कसा असावा’ ही माहितीपुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रमुख ४ गोष्टी असणारे हे ॲप मराठी आणि इंग्रजी असे द्वैभाषिक पर्यायात उपलब्ध करून दिलेले आहे. Vrolla Technologies चे संचालक अविराज मराठे व त्यांच्या टिमने हे ॲप बनविले आहे.

या ॲपच्या कार्यक्रमात पीसीजीटीचे संस्थापक विश्वस्त ज्युलियो रिबेरो यांनी सांगितले की, ॲपचा वापर करून नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक बनविणे हा एक स्तुत्य उपक्रम असून तरुणांपर्यंत हे ॲप पोचविण्यासाठी पीसीजीटी नक्कीच सहकार्य करेल. माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी सांगितले की, कोरोना काळात लोकांची कामे वेळेवर व्हावीत यासाठी आम्हाला माहिती आयुक्तांच्या मागे लागावे लागते. मात्र त्याच काळात संपूर्ण देशातील माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अधिक जागृत झालेले दिसत आहेत. अशावेळी नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन करणारे ॲप आल्यामुळे जास्तीतजास्त लोकांना त्याचा फायदाच होईल. पुण्यातील परिवर्तन भारतचे संस्थापक तन्मय कानिटकर यांनी सांगितले की, हे ॲप लोकांमध्ये नागरी प्रश्नांबाबत जागृती घडवून आणण्यासाठी अत्यंत परिणामकारक आहे. त्याचप्रमाणे लोकसहभागातून होणारा हा प्रकल्प असल्यामुळे वेगवेगळ्या प्रभागातील कार्यकर्ते एकमेकांशी जोडले जातात, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे नगरसेवक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या कामात पारदर्शी आणि उत्तरदायित्व आल्यास लोकशाहीला अधिक बळकटी येईल. पीसीजीटीचे माहिती अधिकार विभागाचे सल्लागार रंगा राव यांनी सांगितले की माझा नगरसेवक My Corporator हे ॲप आल्यामुळे व्यवस्थेतील पारदर्शीपणा अधिक वाढेल अशी आम्हांला आशा आहे.

अप डाऊनलोड लिंक

लिंक आयफोन वापरणारांसाठी

https://apps.apple.com/us/app/majha-nagarsevak/id1540583825

अ‍ॅण्ड्राईड फोन वारणारांसाठी

https://play.google.com/store/apps/details?id=app.mycorporator.in

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना गोरे यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत आणि ओळख डॉ. दीपक पवार यांनी करून दिली. नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक बनविणाऱ्या माझा प्रभाग माझा नगरसेवक या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि कोरोना काळातील तुमच्या नगरसेवकाचे वर्तन या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी माझा नगरसेवक My Corporator हे ॲप जास्तीजास्त नागरिकांनी डाउनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन नागरिकायनचे समन्वयक आनंद भंडारे यांनी केले आहे.