‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं ? NIA कडून नाटय रूपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न, वाझेंना कुर्ता घालून लावलं चालायला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. सध्या वाझे यांची एनआयएकडून कसून चौकशी सुरु आहे. शुक्रवारी (दि. 19) रात्री पावणेअकरा वाजता अंबानी यांच्या घरासमोर वाझेंना आणले होते. त्यांना कुर्ता घालून 3 वेळा चालायला लावले. अंबानींच्या घराबाहेर या घटनेचे एनआयएकडून नाट्यरुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. दरम्यान स्फोटक प्रकरणात एनआयएने स्कॉर्पिओसह इनोव्हा, दोन मर्सिडिज आणि एक टोयोटा लँड क्रूझर प्रॅडो अशा 5 गाड्या जप्त केल्या आहेत.

 

 

 

 

अंबानीच्या घराबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटक प्रकरणात जी गाडी दिसते त्या गाडीमागे पीपीई किट घालून जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती वाझे असावी असा एनआयएला दाट संशय आहे. या संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम समजून घेण्यासाठी एनआयएने शुक्रवारी रात्री अंबानींच्या घराबाहेर नाट्यरुपांतर केले. यात आधी वाझेंना शर्ट आणि पँटमध्ये चालायला सांगितले. त्यानंतर त्यांना कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून चालायला लावले होते. कारण त्या गाडीच्या मागे दिसणारी व्यक्ती सैल कुर्ता घातला होता. एनआयएच्या म्हणण्यानुसार ती व्यक्ती वाझे आहेत. दरम्यान वाझे प्रकरणाची शुक्रवारी कोर्टात सुनावणी झाली, यावेळी एनआयएने आपले लेखी उत्तर सादर केले. आता याप्रकरणी 30 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.