मुंबईकरांनो, Night Curfew मध्ये देखील तुम्ही रस्त्यावर फिरू शकता, फक्त…’ नांगरे पाटलांनी सांगितले नेमके नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. पण या निणर्यानंतर रात्री आम्ही घराबाहेर पडायचे की नाही, याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस दलाचे कायदा सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाईट कर्फ्यूमधून सूट दिली आहे. मात्र हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट तसंच करमणूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही सूट लागू होणार नाही, असेही ते म्हणाले.

रात्रीही तुम्ही रस्त्यावर फिरू शकता, पण…
नाईट कर्फ्यूमध्ये तुम्ही टू व्हिलरने फिरु शकता, पायी फिरु शकता, तसेच चारचाकी गाडीनेही देखील घराबाहेर पडू शकता. मात्र गाडीत चारपेक्षा जास्त जण नसतील याची खबरदारी घ्यावी. कारण हा कर्फ्यू मुंबईकरांच्या सुरक्षिततेकरता असून सुरक्षेपायी हा कर्फ्यू लावल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

ख्रिसमस सण साजरा करण्याबाबतही राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आदेश काढले आहेत. ख्रिसमस सण साध्या पद्धतीने साजरा करावा, चर्चमध्ये 50 पेक्षा जास्त लोक प्रार्थना सभेला उपस्थित राहू नये, तसेच चर्चमध्ये गर्दी होणार नाही, सामाजिक सुरक्षिततेचे अंतर काटेकोर पद्धतीने पाळावे असे आदेश दिले आहेत.