‘मुक्ताफळे’ ! ‘मुंबई कर्नाटकाचा भाग, त्यावर आमचाही हक्क; केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करणार’ – कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री सवदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बेळगाव सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भाग हा केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बेळगाव म्हणजे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री ठाकरेंच्या या विधानानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत. बेळगाव सोडा, मुंबई पण कर्नाटकचा भाग होता, मुंबईवर पण आमचा हक्क आहे. मुंबई प्रदेश हा केंद्रशासित करा, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत, असे विधान सवदी यांनी केले आहे. सवदी यांच्या या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

कर्नाटकात असलेले बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे. या विषयावरील ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प पुस्तकाचा प्रकाशन सोहळयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मोठे नेते उपस्थित होते.

बेळगाव म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकारन बेळगावच नामकरण बेलगाम करून तिथे बेलगामपणे अत्याचार सुरू केले आहेत. याविरोधात आपण पक्षीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

कन्नड संघटनांनी आज प्रकाशित झालेले महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाच्या प्रतीकात्मक प्रती जाळल्या आहेत. बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या आणि अन्य संघटनांनी आंदोलन केले आहे. केंद्र सरकारने पुस्तक प्रकाशित करू देऊ नये, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधातही यावेळी घोषणाबाजी केली.