Pimpri News : ‘पुणेकर थोडे धीट आहेत, पण आता ते घाबरायला लागले आहेत’

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  काही राज्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन होते. मुंबईत देखील काही प्रमाणात पोलिसांना नागरिक घाबरता, पांढरा शर्ट दिसला तरी लांबूनच मुंबईकर गाडीला ब्रेक मारतात. मात्र, याबाबतीत पुणेकर थोडे धीट आहेत. पोलिसांनी कोणत्याही कलरचा शर्ट घातला तरी ते थांबत नाहीत. पण आता पुण्यातील नागरिक घाबरायला लागले आहेत, ते घाबरतात हेच खूप असल्याचा मिश्किल टोला मराठी अभिनेते विजय पाटकर यांनी पुणेकरांना लगावला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून 32 व्या वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात विजय पाटकर बोलत होते.यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डीसले, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, मोहन जाधव यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहतूक चालकांना पोलीस अधिकारी आणि अभिनेते पाटकर यांनी गुलाबाचं फुल देऊन अभिनंदन केले.

विजय पाटकर पुढे म्हणाले, आपण वाहतुकीचे बेसिक नियमही पाळत नाही. लोक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत ही एक कॉमेडीच आहे, असे म्हणत वाहतूक नियम न पाळणाऱ्यांना पाटकर यांनी टोला लगावला. ते पुढे म्हणाले, परदेशात मध्यरात्री तीन वाजता वाहतुकीच्या नियमांचे पालन तेथील लोक करतात. मात्र, आपल्याकडे भरदिवसा तीनच्या सुमारास चालक सुसाट असतात, अशी तुलना त्यांनी परदेशी नियमांसोबत केली.

पाटकर म्हणाले, जे अपघात होतात ते केवळ वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यामुळे होतात. रस्ता सुरक्षेचे नियम मुलासाठी, स्वत:साठी, कुटुंबासाठी पाळूयात. यामुळे आपलं जीवन आणखी सुरळीत होईल, असं आवाहन देखील पाटकर यांनी आपल्या खास विनोदी शैलीत केले.