मुंबईत 12 वर्षात चोरल्या तब्बल 108 सोनसाखळ्या, सराईताला अटक

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईतील विविध भागातील नागरिकांच्या सोनसाखळ्या चोरणार्‍या सराईताला दहिसर पोलिसांनी अटक केले. चोरट्याने 12 वर्षात तब्बल 108 सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली आहे. साजिद अब्दुल अजीज शेख (वय 37 वर्षे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला या चोरीमधे मदत करणार्‍या त्याची पत्नी, मेव्हुणे आणि मित्राला सुद्धा अटक करण्यात यश आले आहे.

शेखने आतापर्यंत मुंबई सह ठाणे, नवी मुंबई, वसई विरार या ठिकाणी अशा प्रकारचे 108 गुन्हे केल्याची माहिती दहिसरचे पोलिस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी दिली आहे. आरोपीचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला आहेत. शेख वांद्र्याच्या रिक्लेमेशनच्या झोपडपट्टीत राहतो. सोनसाखळी चोरीसाठी तो चोरलेल्या दुचाकींचा वापर करत होता. ही मोटारसायकल त्याने कुर्ला पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बीबी नगर परिसरातून चोरली होती.

साजिद हा 2008 पासून चेन स्नॅचिंग करीत होते. त्याला ठाण्याच्या चितळसर पोलिसांनी अटक केली होती. पण जामीन मिळाल्यानंतर तो उत्तर मुंबईत अधिक सक्रिय झाला. दहिसर पोलिसांनी मालवणी येथून 34 वर्षीय आतिफ मोबिल अन्सारीला सीसीटीव्हीच्या मदतीने अटक करण्यात यश मिळविले होते. पोलिसांनी साजिदची पत्नी समीम आणि मेहुणे आरिफ यांना 86 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह अटक केली.