संतापजनक ! पोलिस कर्मचार्‍याला रक्‍तबंबाळ होईपर्यंत मारहाण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस कर्मचार्‍याला रक्‍तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणार्‍या चौघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकल ट्रेनमध्ये चढताना झालेल्या किरकोळ वादातुन चौघांनी पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिस कर्मचार्‍याने आपण पोलिस असल्याचे सांगुन ओळखपत्र दाखवल्यानंतर देखील आरोपींनी त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील ओळखपत्र आणि मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतला होता असे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

तानाजी येरूलवाड असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव असून येरूलवाल हे मुंबईच्या अँटॉप हिल पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. त्यांना मारहाण करणार्‍या अनिकेत जैस्वाल आणि प्रशांत राजे यांना अटक करण्यात आली आहे तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री येरूलवाड हे कामावरून घराकडे म्हणजेच बदलापूरला निघाले होते. कल्याण रेल्वे स्टेशनवरून त्यांनी बदलापूर लोकल पकडण्याचा प्रयत्न केला असता गर्दीतील काही जणांनी त्यांना अरेरावी करीत धक्‍काबुक्‍की केली.

त्यानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ वाद देखील झाला. वादानंतर चौघांनी लोकलच्या डब्यात घुसून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. चौघा आरोपींनी येरूलवाड यांना रक्‍तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. त्यावेळी येरूलवाड यांनी त्यांना आपण पोलिस असल्याचे सांगुन ओळखपत्र दाखविले. त्यावर देखील आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी येरूलवाड यांचे ओळखपत्र आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन घेत फेकुन दिला.

रेल्वे डब्यात येरूलवाड यांना मारहाण केल्यानंतर चौघेजण पळून जात असताना इतर प्रवाशांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. प्रवाशांनी त्यांना कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात नेले. तेथील पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला. आरोपींपैकी दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले तर अनिकेत जैस्वाल आणि प्रशांत राजे यांना अटक करण्यात आली. गुन्हयाचा पुढील तपास कल्याण रेल्वे पोलिस करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us