पोलिस आयुक्‍तांचा मोठा निर्णय : ‘त्या’ पोलिस निरीक्षकाला केले तडकाफडकी बडतर्फ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अवमान केला तसेच वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करून शासकीय सेवेत संशयास्पद वर्तन व गंभीर कृत्य करणार्‍या पोलिस निरीक्षकाला मुंबईचे पोलिस आयुक्‍त सुबोधकुमार जायसवाल यांनी तडकाफडकी बडतर्फ केले आहे.

दत्‍ता गोविंद चौधरी असे बडतर्फ केलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस निरीक्षक चौधरी हे मुंबईतील देवनार पोलिस ठाण्यात कार्यरत होते. देवनार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्हयाचा (गु.र.क्र. 30/2019) तपास निरीक्षक चौधरी यांच्याकडे होता. गुन्हयातील आरोपी हे अटकपुर्व जामिन अर्ज प्रकरणी सुनावणीमध्ये सत्र न्यायालयात गेले होते. सत्र न्यायालयाने चारही आरोपींना अटक करू नये असे आदेश दिले होते. तसेच देवनार विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्‍तांनी देखील केस डायरीमध्ये खात्री केल्याशिवाय तसेच वरिष्ठांच्या परवानगीशिवाय आरोपींना अटक करू नका अशा स्पष्ट सुचना दिल्या होत्या. त्यावर पोलिस निरीक्षक चौधरी यांनी नोटेड सर म्हणुन स्वाक्षरी देखील केली होती. असे असताना देखील गुन्हयातील आरोपींशी पोलिस निरीक्षक चौधरी हे वारंवार संपर्क करून रात्री उशिरा पोलिस ठाण्यात बोलावत होते. अटकपुर्व जामिन मिळवुन देण्यासाठी व गुन्हयाच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी 3 लाख रूपयाची लाच मागत होते. तडजोडीअंती अडीच लाख रूपयात ठरले आणि पहिला हप्‍ता म्हणुन पोलिस निरीक्षक चौधरी यांनी 80 हजाराची लाच घेतली. त्यावेळी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 


पोलिस निरीक्षक चौधरी यांना कायद्याचे सर्वकष ज्ञान असुनही त्यांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला, वरिष्ठांच्या सुचनांचे पालन केले नाही तसेच संशयास्पद व गंभीर कृत्य केले. असे कृत्य करणार्‍यास बचावाची संधी देणे किंवा कारणे दाखवा नोटीस बजावणे योग्य नसल्याने त्यांना पोलिस आयुक्‍तांनी थेट सेवेतुन बडतर्फ केले आहे. पोलिस निरीक्षक दत्‍ता गोविंद चौधरी यांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 311 (2)(बी) अन्वये सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षकाला थेट बडतर्फ केल्यामुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या पोलिस आयुक्‍तांनी न्यायालयाचा अवमान करणार्‍या तसेच वरिष्ठांच्या सुचनांचे पालन न करणार्‍या आणि लाच घेणार्‍या पोलिस निरीक्षकावर ही कडक कारवाई केल्यामुळे इतर पोलिस अधिकार्‍यांवर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा वचक बसणार आहे. पोलिस निरीक्षक चौधरी यांना दि. 15 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा बडतर्फ करण्यात आले आहे.