मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत; CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांना एनआयएने शनिवारी रात्री अटक केली. वाझे यांना अटक केल्यानंतर सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक चुका केल्याचे एनआयएच्या तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या चुकांचे खापर मुंबई पोलीस आयुक्तांवर फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी महत्वाच्या मंत्र्यांसोबत बैठक सुरु आहे. ही बैठक सचिन वाझे प्रकरणावर सुरु असल्याची माहिती मिळत असून या बैठकीत मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

वर्षा बंगल्यावर सुरु असलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित आहे. या नेत्यांमध्ये मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस आयुक्तपदासाठी ही नावे चर्चेत
मुंबई पोलिस आयुक्तांची बदली झाली तर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याचे अंदाज लावले जात आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत काही वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे आहे. यामध्ये रजनीश शेठ, सदानंद दाते, विवेक फणसळकर, जयदीप सिंग, बी.के. उपाध्याय, डॉ. के. वेंकटेशम या वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

पोलीस आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?
मुंबई पोलिस दलातील पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अत्यंत महत्वाची माहिती कशी पोहचली ? यामुळे पोलिस दलातील काही अधिकारी आजही देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून त्यांच्या मार्फेत माहिती पोहचवली जात असल्याचे समोर आले आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूपासून ते हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबाची माहिती लिक झाली होती. यामध्ये पोलीस आयुक्तांचे नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या गृहमंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ देऊ इच्छित नाहीत. त्यामुळे पोलीस आयुक्तांना हटवण्याचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे.