नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची ही कामगिरी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर यातील इतर आरोपी पसार असल्याचे समजत आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीने दीडशेहून अधिक तरुणांना आतापर्यंत गंडवलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगीरथ त्यागी आणि झाकिर हुसेन असं अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. सध्या हे आरोपी पोलिसांच्या तावडीत आहेत. दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. या दोघांनी नोकरीचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातला आहे. सध्या हे पाेलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

सदर दोघांनी यासाठी एक काॅल सेंटरही सुरू केलं होतं. असे अनेक तरूण आहेत जे नोकरीच्या शोधात असतात. त्यांना ते एका तरुणीद्वारे काॅल करत. त्यांना नोकरीचे आमिष दाखवले जाई. शिवाय मुलाखती, परदेश वारीसाठी तिकीटाच्या नावावर तरुणांकडून पैसे उकळण्याचा प्रकार होत होता. त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्यानंंतरही तरुणांच्या हाती काही पडत नसे. आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्यानंतर एका तरुणाने याबाबत मुंबईच्या पायधुनी पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी याबाबत कारवाई केली. आणि सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

फसवणूक करणाऱ्या या टोळीचं मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात जाळं पसरलं आहे. आतापर्यंत टोळीने जवळपास 150 पेक्षा जास्त तरुणांना गंडा घातल्याचा संशय आहे. या टोळीतील दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. परंतु या टोळीतील इतर सहकारी मात्र पसार असल्याचे समजत आहे. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी मोहिम हाती घेतली असून वेगाने काम सुरू आहे.