अभिनेता संदीप नाहर आत्महत्या प्रकरणी पत्नी आणि सासू विरोधात FIR दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता संदीप नाहर आत्महत्या प्रकरणी पोलीसांनी त्याची पत्नी कंचन शर्मा आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला आहे.

अभिनेता संदीप नाहरचा मृतदेह सोमवारी (दि. 15) त्याच्या राहत्या घरी सापडला होता, त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या वैवाहिक जीवनात असणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला होता. शिवाय त्याने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता या व्हिडीओच्या आधारे मुंबई पोलिसांनी त्याची पत्नी कंचन शर्मा आणि सासूविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संदीपने सुसाईड नोटमध्ये पत्नी कंचन शर्मा आणि सासू विनू शर्मा यांच्याविरूद्ध बर्‍याच गंभीर बाबी उघड केल्या आहेत. संदीपने लिहले होते की कंचनशी लग्न केल्यानंतर माझे आयुष्य नरकमय झाले होते. कंचन आणि तिची आई छोट्या छोट्या विषयावरून मानसिक त्रास देत होती. पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून संदीपने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटवरून स्पष्ट होत आहे. पण त्याच सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, माझ्या मृत्यूनंतर कंचनला कोणीही काहीही बोलू नका. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत.