खासदार मोहन डेलकर मृत्यु प्रकरणी दादरा नगर हवेलीचे प्रशासकावर गुन्हा दाखल; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्युप्रकरणी दादरा नगर हवेलीचे प्रशासक आणि गुजरातचे माजी गृहमंत्री प्रफुल्ल खेमा पटेल यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज दिली.
दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांची मुंबईत २२ फेब्रुवारी आत्महत्या केली होती.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी प्रशासक व गुजरातचे माजी गृहमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, असा चिठ्ठीत उल्लेख केला आहे.
काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या आत्महत्येचा तपास एस आयटी करणार अशी घोषणा केली होती. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना पटेल हे गृहमंत्री होते.

खासदार डेलकर यांचे चिरंजीव अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या वडिलांच्या आत्महत्येची चौकशीची मागणी केली होती. डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले होते. महाराष्ट्रात आपल्याला न्याय मिळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार हे आपल्याल न्याय देतील, असे या चिठ्ठीत म्हटले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.