रवी पुजारीनंतर आता डी-कंपनी निशाण्यावर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अंडरवर्ल्ड डी-कंपनीचे रवी पुजारी याला सेनेगल येथे अटक करण्यात आले आहे. शिवाय त्याला  आता भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपूर्ण टोळी परदेशात आहे. डी कंपनीसोबत इतरही अंडरवर्ल्ड डाॅन आहेत जे विविध देशात राहतात आणि तेथूनच मुंबईतला कारभार हाताळतात. गेल्या अनेक वर्षांपासून या सर्वांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असूनही त्यांना पकडण्यासाठी अद्याप मुंबई पोलिसांना यश मिळालेले नाही.

विविध देशात दडून असणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉनच्या यादीत गुरू साटमचा देखील समावेश आहे. गेल्याच महिन्यात पोलिसांनी त्याचा खास माणूस कृष्णकुमार नायरला अटक केली होती. गुरू साटम हा पूर्वी छोटा राजन टोळीसोबत होता.

हे डॉन आहेत निशाण्यावर
आता मुंबई पोलिसांच्या निशाण्यावर असणारं नाव म्हणजे प्रसाद पुजारी. प्रसाद पुजारी हा परदेशात राहून आपला कारभार चालवणारा आणि गुरू साटमहून अधिक सक्रिय असल्याची माहिती अंडरवर्ल्ड नेटवर्कची माहिती असलेले निवृत्त पोलीस अधिकारी प्रफुल्ल भोसले यांनी दिली आहे. पूर्वी प्रसाद पुजारी हा कुमार पिल्लेसाठी काम करत असे. पूर्वी त्याने बंटी पांडे आणि रवी पुजारीसाठी काम केले होते.  प्रसाद पुजारी हा विक्रोळीचा ‘छोकरा’ आहे. शिवाय त्याने नंतर स्वत:ची स्वतंत्र टोळी निर्माण केली.

भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात असलेला विजय तांबट हा देखील पोलिसांच्या निशाण्यावर आहे. तांबटचे मूळ नाव विजय साळवी असे आहे. विशेष म्हणदे तांबट सिंगापूरला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एजाज लाकडावाला हा देखील मुंबई पोलिसांच्या निशाण्यावर आहे. डी-कंपनी सुरेश पुजारी याच्या धमकीच्या फोनच्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

विजय शेट्टीने भरत नेपाळीला मारले होते
सप्टेंबर, २००० मध्ये बँकॉक शूटआउटनंतर छोटा राजनला हॉस्पिटलमधून पळून जाण्यात भरत नेपाळी आणि संतोष शेट्टी यांनी मदत केली होती. नंतर मात्र नेपाळी आणि संतोष शेट्टी वेगळे झाले. विजय शेट्टी हा पोलिसांना हवा होता. विजय शेट्टी बँकॉकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मुख्य म्हणजे विजय शेट्टीनेच भरत नेपाळीचा खून केला होता. इंडोनेशियात असताना अबू सावंत यांने छोटा राजनला सहकार्य केले. परदेशातील छोटा राजनच्या अनेक हॉटेल्सचा कारभार सावंतच पाहतो.