कडक सॅल्युट ! रस्त्यावर चहा विकणाऱ्या मुलाला मुंबई पोलिसाने केली मोठी मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन – सध्या राज्यातच नाही तर संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीचं संकट ओढावलं आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील ओराग्य विभाग, कायदा आणि सुव्यवस्था पणाला लागली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबई विभागातील पोलीस जनतेचे संरक्षण करत आहेत. कोरोना संकटात काम करत असताना अनेक पोलिसांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच देवासारख्या काम करणाऱ्या पोलिसांच्या अनेक कौतुकास्पद बातम्या समोर येत आहेत. असाच एक प्रकार मुंबईत वरळी विभागात घडला आहे.

वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ओंकार व्हनमाने या कर्मचाऱ्याने चहा विकणाऱ्या एका मुलाला शिक्षणासाठी वह्या पुस्तक घेण्यासाठी मदत केली. माटुंगा परिसरात कोरोना बंदोबस्ताच्या ड्युटीवर असताना ओंकार व्हनमारे यांना चहा विकणाऱ्या सागर माने या शाळकरी मुलाची ओळख झाली. त्याची समस्या जाणून घेत ओकार यांनी त्याला मदत केली आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. ओंकार व्हनमाने यांच्या कामाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील कौतुक केलं आहे.

ओंकार व्हनमाने हे मुळचे पंढरपूरचे असून ते सध्या वरळी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. ओंकार यांनी सांगितले की, आज माटुंगा (दादर इथं बदोबस्तासाठी असताना एक 14 वर्षाचा मुलगा आला आणि त्यानं विचारलं, साहेब चहा घेणार का ? त्यानंतर त्यांनी त्याला विचारलं, बाळा तुझं नाव काय ? सागर माने असे नाव त्याने सांगितले. त्याला चहा का विकतो असे विचारले असता त्याने सांगितले, 29 मार्चला वडील वारले. त्यांचं चहाचं कॅन्टीन होतं, आतापर्यंत जितकं कमावलं होतं तितकं सगळं संपलं. घरात आई आणि मी राहतो. आई आजारी असते त्यामुळे मीच चहा बनवून विकतो आणि रोज 200 रुपये कमवतो. कारण आता शाळा चालू झाल्या तर वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाही, तसेच घर भाडं द्यायचं आहे असं त्याने ओंकार यांना सांगितले.

यावर ओंकार यांनी तुला पुढं शिकायचं आहे का ? असा प्रश्न विचारताच, मला तुमच्या सारखं पोलीस व्हायचं आहे, असं त्याने सांगितले. त्यावेळी कोणताही विचार न करता ओंकार यांनी आई-वडिलांनी ज्या प्रकारे संस्कार केले त्या प्रकारे त्याला 10 वीची पुस्तकं आणि वह्या घेऊन दिल्या. एवढेच नाही तर अभ्यासाठी पुढे कोणतीही अडचण आली की मदतीसाठी कायम फोन कर असंही ओंकार यांनी सांगितलं. त्याच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.