CAAच्या समर्थनार्थ होणार्‍या महामोर्चापुर्वीच पोलिसांकडून ‘मनसे’ च्या कार्यकर्त्यांना ‘नोटीसा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात 9 फेब्रुवारीला महामोर्चा काढण्याची तयारी करत आहे परंतु तत्पुर्वी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा बजवण्यात आल्या आहेत. काळाचौकी पोलीस ठाण्याकडून कलम 149 नुसार या नोटीसा बजावण्यात आल्या असून चौकसभेत गैरकृत्य, शांततेचा प्रश्न उपस्थित झाल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

मनसेकडून 9 फेब्रुवारीच्या महामोर्चापूर्वी वातावरण निर्मितीसाठी चौकसभा घेतल्या जाणार आहेत. त्यात कोणताही गैरप्रकार आणि शांतताभंग होऊ नये या हेतूने पोलिसांकडून मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

यावर बोलतना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की आमची भूमिका स्पष्ट आहे, की देशातील जे पाकिस्तानी बांग्लादेशी घुसखोर आहेत ते बाहेर गेले पाहिजेत आणि मला वाटत नाही की संपूर्ण हिंदुस्तानात असा कोणी व्यक्ती असेल की त्याला हा मुद्दा पटत नसेल. त्यामुळे यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

यावर पुढे बोलताना संदीप देशपांडे यांनी प्रश्न उपस्थित केला की जिथे लोकांना रात्री आंदोलन, मोर्चे काढायला परवानगी दिली जात आहे. तेथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, मात्र आम्ही चौकसभा घेतल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो.