मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या वाहनांसाठी कलर कोड, उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या पोलिस आयुक्तांच्या सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने मुंबईसह राज्यभरात 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना रस्त्यावर फिरण्यास मुभा दिली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक गाड्या रस्त्यावर फिरत असल्याने मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिला जाणार आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करणा-यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पोलीस आयुक्त नगराळे म्हणाले की, सध्या मुंबईत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. नीक्ष महत्वाच्या चेक नाका, टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस, रुग्णवाहिका, रुग्णालये यांना फटका बसत आहे. त्यामुळे आपण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी कलर कोड सुरु करत आहोत. यात वैद्यकीय कर्मचा-यांच्या गाड्यांसाठी लाल रंग, भाजीपालाच्या गाडीसाठी हिरवा रंग, इतर अत्यावश्यक सेवासाठी पिवळा रंग असणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना 6 इंच गोल सर्कल लावण्याच्या सूचना नगराळे यांनी दिल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत. दरम्यान लोकल ट्रेन सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. मात्र, तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करून लोकल प्रवास करत आहेत. त्यामुळे आता लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कलर कोडचा वापर करुन तिकीटचा पास देण्याचा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.