राज्य पोलिस दलातील ‘जादूगार’ सुभाष दगडखैर निवृत्त

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – एक उत्तम कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी तसेच पोलिस दलात ‘जादूगार’ म्हणून ओळख असणारे सुभाष दगडखैरे रविवारी ३८ वर्षांच्या पोलिस सेवेनंतर निवृत्त झाले आहे. दगडखैरे यांना जादूच्या कलेसाठी ११७ पुरस्कार मिळाले असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांच्या नावाची नोंद झालेली आहे.

१९८२ सालच्या दरम्यान सुभाष दगडखैरे पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते. तर १९९९ साली दगडाखैरे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नेमणूक झाली. गेल्या ४० वर्षांपासून त्यांना दम्याचा त्रास आहे. परंतु, दम्यावर मात करत त्यांनी अगदी काटेकोरपणे पोलिस अधिकाऱ्याचं कर्तव्य बजावलं. तसेच या धावपळीच्या कामाबरोबरच त्यांनी आपला जादुगरीचा छंद देखील जोपासला.

सुभाष दगडखैरे यांना डॉक्टरांनी दमा असल्याच्या कारणावरून कुठलातरी छंद जोपासावा ज्यात तुमचं मन रमेल असा सल्ला दिला होता. त्यानंतर दगडखैरे यांनी पोलिस प्रशासनाची परवानगी घेत, जादू शिकण्यास सुरुवात केली. कालांतराने ते या कलेमध्ये एवढे रमून गेले की, त्यांना या कलेसाठी आतापर्यंत ११७ पुरस्कार मिळाले आहे. तसेच त्यांच्या जादूची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील झाली. त्यांना वाचनाचा देखील छंद आहे. गेल्या ३५ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर हजारपेक्षा अधिक पुस्तके वाचून काढली आहे.

दरम्यान, सुभाष दगडखैरे यांनी निवृत्त होताना ‘ज्याप्रमाणे शिक्षकांचा प्रश्न मांडणारा, कामगारांचा प्रश्न मांडणारा आमदार विधानसभेवरती निवडून जातो. त्याप्रमाणे पोलिसांचे प्रश्न मांडणारा आमदार देखील विधानसभेवरती निवडून जावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.