रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना मुंबई पोलिसांचा दणका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीआरपी स्कॅममध्ये तिन वृत्तवाहिन्यांवर कारवाई केल्यानंतर आता या घोटाळ्यात नाव आलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. सीआरपीसीच्या कलम १०८ नुसार त्यांच्यावर कारवाई का करू नये, असा सवाल करत मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबावडेकर यांनी अर्णबला १६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.या नोटीसमध्ये केवळ टीआरपी घोटाळ्याचा समावेश नसून पालघर जिल्ह्यातील साधूंची हत्या आणि वांद्रे येथील लॉकडाऊन दरम्यान प्रवाशांचा जमाव, या मुद्दय़ावरून गोस्वामी आणि त्यांच्या वाहिनीने या घटनांना जातीयवाद रंग देऊन हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी त्याच्या वृत्तवाहिनी विरोधात दोन एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. या दोन्ही गुन्ह्याप्रकरणात देखील त्याला या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.दोन्ही गुन्ह्यांमध्ये अर्णबविरोधात दोन समुदायांमध्ये असंतोष आणि जातीय तणाव निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी अर्णब गोस्वामीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. यावर कारवाई सुरु करण्यात आल्याच्या वृत्ताला एसीपी जांबवेडेकर यांनी पुष्टी दिली आहे.

दरम्यान, या नोटीसमध्ये पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असे लेखी बंधपत्र द्या, तसेच १० लाख रुपये जामिनीसाठी भरावे लागणार आहेत. जामीनदार अर्णब गोस्वामीच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणारे हवेत असं म्हटलं आहे.१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता न्यायालयात समक्ष हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळं आता गोस्वामी यावर प्रतिक्रिया देतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.