कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, मुंबई पोलिसांकडून दुसरी नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री कंगना राणावत ( Kangana Ranavat) तिच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली या दोघींना दुसरी नोटीस ( Notice) पाठवली आहे. यानुसार कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात कंगना विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर( FIR) दाखल आहे. त्यामुळे आता तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांनी पहिली नोटीस पाठवल्यानंतर ती चौकशीसाठी हजर झाली नाही. तिने त्यावेळी घरात लग्नकार्य असल्याचे कारण दिले होते. त्यामुळे आता अभिनेत्रीला दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र जर आता कंगना आणि तिची बहीण रंगोली 10 तारखेला वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहिल्या नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. याआधी मुंबई पोलिसांनी या दोघी बहिणींना १ ऑक्टोबरला नोटीस बजावली होती. त्यामध्ये त्यांनी देशद्रोहाच्या आरोपांप्रकरणी कंगना राणावतला 26 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितलं होतं.

मात्र, यावेळी कंगना मुंबई पोलिसांसमोर हजर राहिली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कंगनाला नोटीस पाठवण्यात आली आहे. बॉलिवूडमधील फिटनेस ट्रेनर मुनव्वर अली सय्यद यांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने कंगनाविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायायलाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगनाविरोधात भादवी कलम कलम १५३अ (धर्म, वंश इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये कलह वाढवणे), २९५ अ (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतुपुरस्सर कृत्य) आणि १२४-अ (देशद्रोह) आणि ३४ अंतर्गत एफआयआर दाखल केली होती. यामध्ये दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता तिची दुसऱ्या नोटिशीवर काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.