मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह ट्विट, तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरुन व्हीपी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
ट्विटरवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याबद्दलची काही छायाचित्रे ट्विट करत त्याच्याखाली आक्षेपार्ह भाषेचा वापर करत शिवीगाळ करण्यात आली आहे. समित ठक्कर या नावाचे हे ट्विटर अकाउंट असून, त्याच्यावरुन नेत्यांबद्दल करण्यात आलेल्या सहा ट्विटसंदर्भात तक्रार देण्यात आली आहे. त्या तक्रारीमध्ये शिवीगाळ करुन नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्याप्रकरणी भादंवि कलम २९२, ५०० व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित ट्विटर अकाउंट वरुन उद्धव ठाकरे यांच्याविषयी १ जून रोजी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला होता. तर ३० जून व १ जुलै रोजी या अकाउंटवरून आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट करण्यात आलं आहे. तसेच १ जुलैला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याबद्दल ट्विट करताना आरोपीने शिवीगाळ केली होती. हे सर्व ट्विट मिश्रा यांनी पाहिल्यावर यासंदर्भात व्हीपी रोड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रारीत संबंधित अकाउंटवरून करण्यात आलेले आक्षेपार्ह ट्विटचे स्क्रीनशॉटही पुरावे म्हणून जोडले गेले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.