मुंबई : 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाल्या प्रकरणी विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सात दिवसांत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या समितीला दिले आहे. या संदर्भात नितीन राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

नितीन राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई आणि परिसरातील वीजपुरवठा खंडीत घटनेची चौकशी तसेच तांत्रिक लेखापरीक्षण करुन उपाययोजना सुचविण्यासाठी तांत्रिक, लेखापरिक्षण समिती नेमण्यात येणार असून याबाबत शासन निर्णयही जाहीर झाला आहे. तसेच सात दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये 12 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटले होते. त्यामुळे मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला होता. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले होत. मात्र, यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता.