Fake Video Viral झाल्यानं खळबळ ! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद नाही, वाहतुकीसाठी आहे सुरु; पोलिसांचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद करण्यात आली असून, कोणीही मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करू नये, असे आवाहन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी यावर स्पष्टीकरण देत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद नसून, वाहतुकीसाठी सुरु आहे, असे सांगितले आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आता ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातच आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्र वाहतूक पोलिस विभागाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘हा व्हिडिओ जुना असून, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन काळातील हा व्हिडिओ आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी सुरु आहे. तसेच कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकराने ज्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या लोकांनी पाळाव्यात अन्यथा गाईडलाईन्सचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आम्ही कडक कारवाई करू’, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ खोटा आहे. त्याकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये. मात्र, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी नाकाबंदी असून, अत्यावश्यक सेवेत नसलेल्या नागरिकांची कसून चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. मात्र, अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना प्रवासाची मुभा आहे, असेही त्यांनी सांगितले.