फिल्मस्टार बनण्यासाठी मुंबईत आला अन् गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशातून मुंबईमध्ये फिल्मस्टार बनण्यासाठी आलेल्या युवकाला कामात यश न आल्याने अखेर तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या मेलगाड्यांमध्ये बसलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करण्याचा त्याने उद्योग सुरू केला. मात्र, त्याचा हा उद्योग फारकाळ टिकला नाही. लोहमार्ग पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.

मुंबईहून कोकणात जाणाऱ्या मेलगड्यांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. लोहमार्ग पोलीस आरोपीच्या मागावर दोन महिन्यांपासून होते. पनवेल ते मुंबई असा कोकणातून येणाऱ्या एक्सप्रेसमधून पेट्रोलिंग करून पोलिसांनी आरोपी मोहमद सैफ याला बेड्या ठोकून त्याची रवानगी जेलमध्ये केली.

मोहमद सैफ हा उत्तर प्रदेशातून मुंबईमध्ये हिरो बनण्यासाठी आला होता. तो मागील तीन वर्षापासून मुंबईत वास्तव्यास आहे. तो रात्री तसेच पहाटेच्या वेळी मेलगाडीतून प्रवास करताना दरवाज्याकडे बसलेल्या प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पलायन करत होता. एक्सप्रेस गाडीमध्ये दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने लोहमार्ग पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना सैफच्या संशयास्पद हालचालीमुळे त्याचा संशय आला.

त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने अनेक चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले. सैफ धारावी मध्ये भाड्याने राहत होता. चोरी केल्यानंतर सोन्याचे दागिने पनवेल येथील सोने गाळणीचे काम करणाऱ्या साबीर शेख यास विकल्याचे सांगितले.

पोलिसांनी साबीर शेख याला ही अटक केली. सैफ हा मुंबईमध्ये चोरी करून मिळालेले पैसे घेऊन गावी जात होता. पैसे संपल्यानंतर पुन्हा मुंबईत येऊन तो चोरी करत होता.चौकशी दरम्यान त्याने उत्तर प्रदशमधून मुंबईमध्ये मॉडेलिंग आणि फिल्मस्टार बनण्यासाठी आला होता.मात्र परिस्थितीमुळे कामात यश न आल्याने गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाल्याचे त्याने सांगितले.