नुसते फिरुन उपयोग काय ?, आशिष शेलारांचा शिवसेनेवर ‘हल्लाबोल’

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईतील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे रस्ते, रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली. अनेक भागांमध्ये पाणी घरांमध्ये घुसले होते. पाणी साचल्याच्या मुद्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेकडे सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर तत्कालीन आयुक्तांनी केलेला नालेसफाईच्या दाव्यावरूनही टोला लगावला आहे.

पावसामुळे मुंबईत अनेक घरांमध्येही पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्यानंतर आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रश्न विचारला आहे. पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका? नुसते फिरुन उपयोग काय? ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा? मायक्रोटनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा? पाण्याचा निचरा होण्यास एव्हढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा?, असे शेलार यांना म्हटले आहे. हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी का अजून कमी होत नाही? 116 टक्के नालेसफाईचे दावे कुठे गेले? रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय? कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग, मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही?, असे विचारत शेलार यांनी प्रश्नांचा पाऊसच शिवसेनेवर पाडला आहे .