कांदिवलीत महामार्गावर दरड कोसळली, थोडक्यात दुर्घटना टळली

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पावसामुळे कांदिवलीत महामार्गावर आज सकाळी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. आधीच कोरोनाची सामना करणार्‍या मुंबईकरांचे पावसामुळे हाल झाले आहे. लाईफलाइन असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे.

कांदिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी दरड कोसळली आहे. टाईम्स ऑफिसच्या कार्यालयाजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. दरड कोसळल्यामुळे एका बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.

अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे स्थानकावर सायन इथं ट्रॅकवर पाणी साचले आहे. परेल आणि सायन स्थानकात पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर ठाणे ते कल्याण, कर्जत कसारा वाहतूक सुरू आहे. हार्बर मार्गावर वडाळा स्थानकात पाणी भरल्याने सीएसएमटी ते वाशी वाहतूक ठप्प झाली आहे. परंतु, वाशी ते पनवेल वाहतूक सुरू आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.