मुंबईतील कोविड वॉर्डमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे रुग्णांचे हाल

पोलिसनामा ऑनलाईन – काल रात्रीपासून मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहे. कोरोनाचे संकट असताना आता पावसाच्या कहरामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुडघाभऱ पाणी साचले असून नागरिकांना रुग्णालयात जाणे-येणे बंद झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोविड वॉर्डमध्ये पाणी साचले आहे.यातून संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर पालिकेने तातडीने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. येत्या 24 तासांत मुंबईत मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.