काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या मुंबईतील बंगल्यात ‘कोरोना’चा शिरकाव

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्याच्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 50 हजाराच्या वर गेली आहे. आता कोरोना व्हायरसने थेट मंत्र्यांच्या बंगल्यात शिरकाव केल्याचे पहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाचे खाते सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठ मंत्र्याच्या बंगल्यातील निवासी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. संबंधित मंत्री संध्या मुंबईत नाहीत. यामुळे सरकारी रुग्णालयातून चाचणी झाल्यानंतर त्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. तसेच त्यांना होम क्वारंटाईनमध्ये देखील पाठवले नाही.

कोरोनाबाधित कर्मचारी बांधकाम खात्याने दिलेल्या लहान जागेत कुटुंबासह रहात आहेत. त्यांना रुग्णालयात हलवले जावे, महापालिकेने महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांची निवासस्थाने सुरक्षित ठेवावीत अशी मागणी होत आहे. यामुळे मलबार परिसरात बड्या सरकारी निवासस्थानांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे मंत्री काँग्रेस पक्षाचे असून त्यांना या प्रकाराची कल्पना दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हा मलबार हिल येथील एका मजलाच सील करण्यात आला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी बंदोबस्ताला असलेल्या काही पोलीस अधिकाऱी-कर्मचारी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे खळबळ उडाली होती. तसेच काही शासकिय अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच समोर आले आहे. आता काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बंगल्यात देखील कोरोनाने शिरकाव केल्यामुळे मलबार हिल परिसरात भतीचे वातावरण आहे.