आता रश्मी ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या नव्या संपादक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनामध्ये एक खुप मोठा बदल केला आहे. सामनाच्या संपादकपदी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. आजपासून त्या सामनाच्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते.

रश्मी ठाकरे या सक्रिय राजकारण आणि सामनाचे कामकाज यापासून अलिप्त होत्या. मात्र आता त्यांच्याकडे थेट सामानाच्या संपादक पदाची धूरा देण्यात आली आहे. संपादक पद लाभाचे असल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर ते सोडावे लागले होते. त्यानंतर आता प्रेस लाइनमध्ये आजपासून रश्मी ठाकरे यांचे नाव प्रसिद्ध झाले आहे.

सामनाचे संपादक पद काही दिवसांपासून रिक्त होते. संजय राऊत यांच्याकडेच ती जबाबदारी होती. सामनातून शिवसेना आपली भूमिका सातत्याने मांडत असते. त्यामुळे सामनाचा अग्रलेख हा माध्यमांसाठी महत्वाची बातमी ठरत असतो. सामनाच्या अग्रलेखातून मागील काही काळापासून भाजपावर सातत्याने प्रहार करण्यात येत आहेत. यामुळे देशातील माध्यमांचे लक्ष सामानाच्या अग्रलेखांकडे लागलेले असते. आता नवी जबाबदारी रश्मी ठाकरे कशी सांभाळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.