After Lockdown : वाहतूककोंडीत मुंबई जगात दुसरी, बंगळुरु 6 व्या, तर दिल्ली 8 व्या क्रमांकावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सन 2020 मधील सर्वाधिक वाहतूक कोंडींच्या शहरांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीत रशियाची राजधानी मॉस्को हे एकमेव शहर सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या प्रथम क्रमांकावर आहे. तर मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फारशी वाहतूक नसतानाही मुंबई या नकोश्या यादीत जगात दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत भारतातील आणखी 2 शहरांचाही समावेश असून बंगळुरु 6 व्या तर दिल्ली 8 व्या स्थानी आहे. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जगभरातील 57 देशांमधील 416 शहरांचा अभ्यास केल्यानंतर ही यादी जाहीर केली आहे.

मुंबईमधील वाहतूक कोंडीची परिस्थिती दर वर्षाला बिकट होत असल्याचे चित्र या आकडेवारीमधून दिसून येत आहे. सन 2019 आणि 2018 च्या यादीमध्ये मुंबई चौथ्या स्थानी होती. मात्र यंदा मुंबईने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईच्या उलट बंगळुरुमधील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मागच्या वर्षी पाचव्या स्थानी असणारे बंगळुरु शहर यंदा सहाव्या स्थानी आहे. सध्या 51 टक्के वाहतूक कोंडी असणाऱ्या बंगळुरुमध्ये 2019 मध्ये 71 टक्के वाहतूक कोंडी होत असत.

जगभरातील 400 हून अधिक शहरांमधील वाहतूक कोंडीवर अभ्यास केल्यानंतर मुंबईला दुसरे सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर म्हणून घोषित केले असले तरी एक समाधानकारक बाब सुद्धा या अहवालामध्ये नमूद केली आहे. यादीमध्ये मुंबईने दोन स्थानांनी झेप घेतली असली तरी मुंबईतील वाहतूक कोंडीचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा 12 टक्क्यांनी कमी आहे.

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालानुसार मुंबईमधील वाहन चालकांचा वाहतूक कोंडीमुळे सर्वसाधारण वेळेपेक्षा 53 टक्के अधिक वेळ प्रवासामध्ये जातो. मुंबईप्रमाणेच या यादीमध्ये फिलिपिन्समधील मनिला, कंबोडियामधील बोगोटा, रशियामधील मॉस्को आणि नोव्होसीबीर्स, युक्रेनमधील कॅव्ही, पेरुमधील लिमा, टर्कीमधील इस्तंबूल आणि इंडोनेशियामधील जकार्ता शहराचा समावेश आहे.

टॉमटॉमचे अधिकारी पराग बेडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसहीत जगभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये यंदा वाहतूक कोंडीचे प्रमाण घटण्यामागील प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊन आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीचा अभ्यास केल्यानंतर सकाळच्या वेळेतील वाहतूक कोंडी ही 2020 मध्ये 18 टक्क्यांनी तर संध्याकाळच्या वेळातील वाहतूक कोंडी ही 17 टक्क्यांनी कमी झाल्याचे ते म्हणाले. कोरोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्यांनी घरुन काम करण्याची मूभा दिल्याने मुंबईसहीत सर्वच शहरांमधील वाहतूक कोंडीच समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले असे बेडारकर यांनी नमूद केले आहे.

टॉमटॉम कंपनी मोठ्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांबरोबरच सरकारलाही या वाहतूक कोंडीसंदर्भातील माहितीच्या आधारे मदत करते. सरकारी यंत्रणांना अधिक चांगल्याप्रकारे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे, सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे नियोजन करण्यासाठी ही माहिती पुरवली जाते.